टाटा मेमोरियल सेंटरच्या कामगारांच्या लढ्याला मोठे यश! आंदोलनापूर्वीच प्रशासनाचे लेखी उत्तर


मुंबई | ११ ऑगस्ट २०२६ | प्रतिनिधी

टाटा मेमोरियल सेंटर, परळ येथील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने लेखी उत्तर दिल्याने कामगारांच्या लढ्याला महत्त्वाचे यश मिळाल्याचा दावा शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेने केला आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका स्पष्ट केल्याचे संघटनेने म्हटले आहे.

कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या वतीने टाटा मेमोरियल सेंटर प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले होते. स्थानिक व कंत्राटी कामगारांचे प्रश्न, रिक्त पदे, भरती प्रक्रिया, वेतन पावती, कामगारांचे हक्क, प्रशिक्षण, पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता या महत्त्वाच्या मुद्द्यांचा निवेदनात समावेश होता.

भरती प्रक्रियेबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट

प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरानुसार, अनुभवी आणि विद्यमान कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा नियमानुसार विचार केला जाणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती लागू नियम आणि निर्धारित भरती प्रक्रियेनुसार केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच, कामगारांना लागू असलेल्या कामगार कायदे व नियमांनुसार कामाचे तास, साप्ताहिक सुट्टी आणि इतर सेवा-सुविधांचे पालन केले जात असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

MTS कर्मचाऱ्यांना WhatsApp वर वेतन पावती

कामगारांच्या वेतनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावरही प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली आहे. MTS कर्मचाऱ्यांना कंत्राटदारामार्फत WhatsApp द्वारे वेतन पावती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

कंत्राटदारांच्या नियुक्तीत पारदर्शकतेचा दावा

कंत्राटदारांची नियुक्ती सरकारी संकेतस्थळावरील निविदा प्रक्रियेद्वारे पारदर्शक पद्धतीने केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विविध पदांवरील भरती ही संबंधित Recruitment Rules आणि सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार केली जाणार आहे. रिक्त पदे निर्माण झाल्यानंतर प्रशासकीय गरज, मंजुरी आणि सक्षम प्राधिकरणाच्या प्रक्रियेनुसार ती भरण्याची कार्यवाही केली जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

भरतीत समान संधी आणि निष्पक्षतेवर भर

भरती प्रक्रियेत पात्रता, निवड पद्धत, शुल्क, शैक्षणिक अर्हता आणि इतर निकष हे संबंधित भरती नियमांनुसार निश्चित केले जातात. तसेच भरती प्रक्रियेत निष्पक्षता, पारदर्शकता आणि समान संधी राखली जाईल, अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केल्याचे संघटनेने सांगितले.

कामगारांचा प्रश्न मांडला, प्रशासनाकडून लेखी उत्तर मिळवले”

कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवल्यामुळे प्रशासनाला विविध मुद्द्यांवर आपली भूमिका लेखी स्वरूपात स्पष्ट करावी लागली, हे या प्रक्रियेतील महत्त्वाचे यश असल्याचे शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेने म्हटले आहे.

“कामगारांचा प्रश्न मांडला, प्रशासनाकडून लेखी उत्तर मिळवले. हीच शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेची कामगारांसाठीची संघर्षशील वाटचाल आहे. श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, कामगारांना न्याय मिळेपर्यंत आवाज बुलंद राहणार,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे.

कामगार नेतृत्वाची भूमिका

या लढ्यात प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, प्रदेश सचिव अमित भटनागर, प्रदेश संघटक नानासाहेब बच्छाव, सफाई कामगार सेल प्रदेश अध्यक्ष संतोष मकवाना, महिला कामगार प्रदेश अध्यक्ष सौ. आशाताई वैकुंठे, टाटा मेमोरियल सेंटर युनियन अध्यक्ष दिनेश चावडा, युनियन सचिव संजय फाटक आणि खारघर युनिट कार्याध्यक्ष सचिन मोरे यांचा सहभाग असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुढील काळातही संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.

“चला परळकडे… कामगारांच्या न्यायासाठी! चला मोठ्या संख्येने… एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी!” असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!