पुण्यात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद; स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत निवडणुका लढवण्याचे आवाहन
पुणे : भटके विमुक्त समाजाने आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून आपली राजकीय ताकद दाखवली पाहिजे. निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे, तरच हक्क-अधिकार मिळतील आणि आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
भटके विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या वतीने पुण्यातील साने गुरुजी स्मारक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा परिषदेचे संयोजक ॲड. डॉ. अरुण जाधव, स्वागताध्यक्ष तथा भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम, ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाने, ॲड. अरविंद तायडे, प्राचार्य बाबुराव शिंदे, डॉ. दीपा राजमाने, उमाताई जाधव यांच्यासह अंबरसिंग चव्हाण आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मताची किंमत करणार नाही, स्वतःला विकणार नाही’ यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपल्या विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत आणायची असेल तर प्रत्येकाने गावागावात जाऊन जनजागृती केली पाहिजे. निवडणुकीच्या वेळी ‘मी माझ्या मताची किंमत करणार नाही, स्वतःला विकणार नाही आणि दुसऱ्यालाही विकू देणार नाही,’ असा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे.
आपण आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या हक्काची भाकर खात असू, तर स्वाभिमानाने जगले पाहिजे. दुसऱ्यांची गुलामगिरी आणि लाचारी स्विकारण्याऐवजी आपला स्वाभिमान जिवंत ठेवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
‘बिऱ्हाड मोर्चा’ची आठवण; कायदे करण्यासाठी सत्तेत प्रतिनिधित्व गरजेचे
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी 1990 साली काढलेल्या ‘बिऱ्हाड मोर्चा’ची आठवण करून दिली. त्यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी मोर्चाला अडवले आणि त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात वकिलांनी याचिका दाखल केली. केवळ ‘हॅबिट्युअल ॲक्ट’च्या आधारे एखाद्याला गुन्हेगार ठरवता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयासमोर मांडण्यात आली आणि त्यानंतर हा कायदा रद्द झाला, असे त्यांनी सांगितले.
कोर्ट एखादा कायदा रद्द करू शकते; मात्र नवीन कायदे करण्यासाठी विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा यांसारख्या लोकप्रतिनिधींच्या सभागृहांमध्ये आपले प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. त्यामुळे भटके विमुक्त समाजाला आपले हक्काचे प्रतिनिधी निवडून आणावे लागतील, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
‘ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणुका लढवा’
परिषदेचे संयोजक ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, भटके विमुक्त समाजाला माणूस म्हणून स्वाभिमानी जीवन जगता आले पाहिजे. यासाठी मागील महिन्यात राज्यभर ‘मुसाफिर यात्रा’ काढून भटके विमुक्त समाजामध्ये जनजागृती करण्यात आली.
पुण्यातील राज्यस्तरीय परिषदेसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील भटक्या विमुक्तांच्या पालांवर जाऊन माहिती देण्यात आली. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटूनही संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्त समाजाला रस्त्यावर उतरावे लागते, हे दुर्दैवी आहे, असे जाधव म्हणाले.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा प्रत्येक स्तरावरील निवडणुका भटके विमुक्त समाजाने लढवून जिंकल्या पाहिजेत. तरच समाजाचा आवाज बुलंद होईल, असे त्यांनी सांगितले.
पारंपरिक लोककलावंतांची भव्य मिरवणूक
परिषदेच्या उद्घाटनापूर्वी सकाळी 11 वाजता सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून भटके विमुक्त प्रवर्गातील पारंपरिक लोककलावंतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत नंदीवाले, वासुदेव, पिंगळा जोशी, मरीआईवाले, गोंधळी, उंटवाले, रायरंद, बहुरूपी, गोसावी, चित्रकथी, डोंबारी, कोल्हाटी, नाथपंथी डवरी गोसावी यांसह विविध जाती-जमातीतील पारंपरिक लोककलावंतांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, वाद्ये, नृत्य आणि संगीताने मिरवणुकीला विशेष रंगत आली.

‘भटक्या विमुक्तांच्या पंचाहत्तरी’ पुस्तकाचे प्रकाशन
या कार्यक्रमात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ॲड. डॉ. अरुण जाधव लिखित ‘भटक्या विमुक्तांच्या पंचाहत्तरी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून परिषदेचे उद्घाटन झाले. प्रारंभी शाहीर सचिन माळी, शीतल साठे आणि सहकाऱ्यांनी आंबेडकरी नवयान जलसा सादर केला.
लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष तथा भैरव क्रांती सेनेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. बाबुराव सुरपे यांनी आभार मानले.
यावेळी अंबरसिंग चव्हाण, ॲड. मंगेश ससाने यांचीही भाषणे झाली. परिषद यशस्वी करण्यासाठी विशाल पवार, ऋषिकेश गायकवाड, संदीप आखाडे, ललिता पवार, रेश्मा औटी, भक्ती पवार, मच्छिंद्र जाधव, संदीप आव्हाड, सागर कांबळे, उर्मिला कवडे, नीता इंगळे आदींनी परिश्रम घेतले.









