डोंबिवलीत विश्वविक्रमी तिरंगा रॅली; ३५ हजार चौरस फुटांच्या तिरंग्याखाली हजारो नागरिकांचा राष्ट्राभिमान


डोंबिवली | १५ ऑगस्ट : – स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता आणि देशभक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. ‘तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया’ या संकल्पनेतून डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या विश्वविक्रमी तिरंगा रॅलीला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हजारो देशप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी हातात घेऊन डोंबिवलीच्या रस्त्यांवरून दिमाखात नेला. या ऐतिहासिक उपक्रमाची World Records India, Asia Book of Records आणि India Book of Records  यांच्या माध्यमातून अधिकृत नोंद प्रक्रिया करण्यात येत आहे.

रॅलीच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस सुरू असतानाही डोंबिवलीकरांचा उत्साह कायम राहिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर लोकमान्य टिळक पुतळा, चार रस्ता, नेरुरकर पथ मार्गे रॅली दत्तनगर येथे पोहोचली.

संपूर्ण मार्गावर विशाल तिरंगा, देशभक्तीपर घोषणा आणि गीतांनी वातावरण भारावून गेले होते. नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा राष्ट्राभिमान आणि उत्साह हा डोंबिवलीच्या सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला.

या रॅलीमध्ये ५० हून अधिक शाळांमधील १० हजारांहून अधिक विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक सहभागी झाले. याशिवाय १०० हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माजी सैनिक, स्काऊट-गाईड, एनसीसी-एनएसएस कॅडेट्स तसेच साहित्य, कला, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला.

दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ रॅलीचा समारोप झाला. यावेळी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान आयोजकांना मिळाला.

“तिरंगा हा केवळ तीन रंगांचा ध्वज नाही; तो भारताच्या एकतेचा, अखंडतेचा, त्यागाचा, शौर्याचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे. एका विशाल तिरंग्याखाली हजारो नागरिकांनी पक्षीय आणि सामाजिक भेद बाजूला ठेवून एकत्र येणे, हीच डोंबिवलीच्या सामाजिक एकतेची खरी ताकद आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे, शाळांचे, सामाजिक संस्थांचे, माजी सैनिकांचे, एनसीसी-एनएसएस कॅडेट्सचे, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे आणि डोंबिवलीकर नागरिकांचे आयोजकांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती होती.


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!