Gen Z सोबत श्रीकांत शिंदेंचा थेट संवाद; AI, रोजगार, Startupसह विद्यार्थ्यांनी मांडले विविध प्रश्न


मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात श्रीकांत शिंदे सहभागी झाले. यावेळी नेहमीच्या भाषणाच्या चौकटीऐवजी आजच्या Gen Z पिढीसोबत थेट, मनमोकळा आणि मुक्त संवाद साधण्यात आला.

आजची युवा पिढी केवळ देशाचे भविष्य नसून वर्तमान घडवणारी आणि उद्याच्या भारताची दिशा ठरवणारी पिढी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील अपेक्षा, त्यांना भेडसावणारी आव्हाने आणि भविष्यासंदर्भातील त्यांच्या आकांक्षा जाणून घेण्यावर या संवादात भर देण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे भविष्यात बदलणारे रोजगाराचे स्वरूप, रोजगारनिर्मिती, शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी, ऑनलाइन शिक्षणाची सक्षम व्यवस्था, स्पर्धा परीक्षांची तयारी, Startup सुरू करण्यासाठी मिळणारी मदत, Fellowshipच्या संधी, कौशल्यविकास आणि नशामुक्त युवा अशा विविध विषयांवर थेट प्रश्न उपस्थित केले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमधून युवा वर्ग आपल्या भविष्याबाबत अत्यंत जागरूक असल्याचे दिसून आले. केवळ आश्वासनांपेक्षा स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी योग्य संधी, रोजगाराच्या संधी आणि सक्षम व्यवस्था मिळावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

या प्रश्नांना उत्तर देताना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून युवा वर्गासाठी शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार, स्वयंरोजगार, Startup आणि युवा सक्षमीकरणाच्या क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली.

बदलत्या काळानुसार तरुणांच्या गरजाही बदलत असून, त्या गरजा समजून घेऊन युवा वर्गाला भविष्यासाठी तयार करण्याच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. देशातील आणि राज्यातील युवा वर्गाच्या आकांक्षा, स्वप्ने आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांशी झालेला हा संवाद केवळ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम न राहता, नव्या भारताच्या स्वप्नांना आणि युवा पिढीच्या आकांक्षांना समजून घेण्याचा प्रयत्न ठरला.


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!