कळमनुरी ते हिंगोली कावड यात्रेत श्रीकांत शिंदे सहभागी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर


हिंगोली | प्रतिनिधी – ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने कळमनुरी ते हिंगोलीचा परिसर भक्तिमय झाला. कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीतील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत निघालेल्या भव्य कावड यात्रेत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे सहभागी झाले.

श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या कावड यात्रेतील सहभागाची माहिती दिली. हजारो शिवभक्तांच्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. खांद्यावर कावड, हातात भगवे ध्वज, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि ओठांवर महादेवाचे नामस्मरण अशा वातावरणामुळे संपूर्ण यात्रा मार्ग अक्षरशः शिवमय झाल्याचे त्यांनी नमूद केले.

ढोल-ताशांचा निनाद, डौलाने फडकणारे भगवे ध्वज आणि प्रत्येक पावलागणिक घुमणारा ‘हर हर महादेव’ चा जयघोष यामुळे यात्रेत मोठा उत्साह पाहायला मिळाला. हजारो शिवभक्तांच्या सहभागामुळे कावड यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

या भव्य यात्रेच्या आयोजनामागे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या संपूर्ण टीमची अथक मेहनत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सुरू असलेली ही परंपरा आता केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता हिंगोली आणि संपूर्ण मराठवाड्याच्या धार्मिक-सामाजिक जीवनातील एक भव्य उत्सव बनल्याचेही त्यांनी नमूद केले.‘आजची प्रचंड गर्दी ही केवळ गर्दी नव्हती; ती संतोष बांगर यांनी अनेक वर्षांत कमावलेल्या लोकविश्वासाची पावती होती,’ असे शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष बांगर, त्यांचे सहकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि सेवाभावी मंडळींचे त्यांनी अभिनंदन केले. यात्रेच्या मार्गावर भाविकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या नागरिकांचेही त्यांनी कौतुक केले.

यावेळी शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून हिंगोलीच्या भूमीतून घुमलेला ‘हर हर महादेव’चा जयघोष संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात घुमत राहावा, अशी भावना व्यक्त केली. तसेच भगवान भोलेनाथाने प्रत्येक शिवभक्ताच्या मनोकामना पूर्ण कराव्यात आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

https://youtube.com/shorts/-Ikbj61Opu0?si=8YUIp_7Q-tqW0A_v


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!