महाराष्ट्राचा कापूस थेट लंडन-न्यूयॉर्कच्या बाजारपेठेत झळकणार; ‘फार्म टू फॉरेन’मधून महाराष्ट्राला ग्लोबल एक्सपोर्ट हब बनवण्याचा निर्धार


मुंबई | असोचेमच्या वतीने वांद्रे येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण विचारमंथन झाले. या परिषदेत सहभागी होत महाराष्ट्राच्या कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक बाजारपेठेशी जोडण्याबाबत मनोगत व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्राच्या मातीत पिकणाऱ्या कापसापासून तयार होणारी उत्पादने आता थेट परदेशातील बाजारपेठेत पोहोचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. कापूस उत्पादनापासून जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, ‘फार्म टू फॉरेन’च्या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक एक्सपोर्ट हब बनवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी राज्य सरकार ‘फाइव एफ’ व्हिजनवर काम करत आहे. फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन या संकल्पनेतून शेतीमालाला मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतरित करून त्याला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

महाराष्ट्रातील कापूस, रेशीम, जूट तसेच फळांना जागतिक ब्रँडिंग मिळवून देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला केवळ देशांतर्गत बाजारपेठेपुरते मर्यादित न ठेवता त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या दिशेने ही संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे.

“कापसापासून तयार होणाऱ्या धाग्यांतून आपण केवळ कपडे तयार करत नाही, तर विकसित भारताचे भविष्य विणत आहोत,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच आगामी काळात लंडन, न्यूयॉर्क आणि पॅरिसमधील फॅशन शोरूममध्ये ‘Made in Maharashtra’ हा टॅग पाहायला मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या परिषदेला असोचेम महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद हर्डीकर, अजय अरोरा, कार्तिकेय धंडा, वृंदा मनोहर देसाई, चिन्मयी देऊळगावकर, आमदार प्रा. मनीषा कायंदे यांच्यासह उद्योजक, धोरणकर्ते आणि जागतिक स्तरावरील तज्ज्ञ उपस्थित होते.


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!