त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून त्यांना मानाचे स्थान देण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त व माजी नगराध्यक्ष ललिता शिंदे-देशमुख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली.
शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा उल्लेख
ललिता शिंदे-देशमुख यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या कार्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे, यात्रास्थळे आणि मंदिरांच्या संरक्षणाची जबाबदारी ऐतिहासिक काळात मराठा सत्तेने समर्थपणे पार पाडली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभ सोहळ्यात शिवरायांच्या कार्याचे स्मरण होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
खासदार व मंत्र्यांची भेट घेणार
या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यापुढे मांडण्यासाठी आपण सातारा येथे आल्याचे ललिता शिंदे-देशमुख यांनी स्पष्ट केले.









