मुंबई | मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट नाकारल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या निषेधार्थ मुन्सिपल कामगार संघाच्या वतीने आज (२५ ऑगस्ट) मुंबईतील हजारो सफाई व पालिका कामगारांनी संप पुकारला आहे.

कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवा प्रश्न आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महापालिका मुख्यालयात जाणार होते. मात्र आयुक्तांकडे भेटीसाठी वेळच नव्हता अर्थात एकंदरीत आयुक्तांनी भेट नाकारल्याचा आरोप संपातील कर्मचाऱ्याद्वारे करण्यात आला. यामुळे कामगार संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
आजच्या संपामुळे मुंबईतील अनेक भागांतील सफाई सेवा, घनकचरा उचलणे आणि काही महापालिका सेवा प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका मुख्यालयाबाहेर कामगार मोठ्या संख्येने एकत्र येत असून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे

मुन्सिपल कामगार संघाने स्पष्ट इशारा दिला आहे की, कामगारांच्या मागण्यांवर आणि आयुक्तांच्या भूमिकेबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.









