चेंबूरमध्ये गुंडाचा चाकू हल्ला : बिअर नाकारल्याचा राग जीवावर बेतला


मुंबई : चेंबूर कॅम्प, एम.एस. बिल्डिंग क्रमांक ३१ येथे राहणारे प्रशांत बाळू आव्हाड (वय ३३, व्यवसाय – नोकरी) हे ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १.०० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान आपला मित्र ललित वलोदरा यांच्यासोबत चेंबूर कॅम्प परिसरात बिअर पीत उभे होते. याच वेळी परिसरात गुंडप्रवृत्तीचा एक इसम (वय अंदाजे २५ वर्षे) तेथे आला आणि त्याने फिर्यादीकडे बिअर मागितली.

फिर्यादीने बिअर देण्यास नकार दिल्यामुळे संबंधित आरोपी संतापला. रागाच्या भरात त्याने जवळ असलेला चाकू काढला आणि फिर्यादीला जीवे मारण्याची उघड धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता तो थेट फिर्यादीच्या अंगावर धावून गेला आणि त्याने फिर्यादीच्या मानेवर चाकूने वार केला.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फिर्यादीने प्रतिकार करत डाव्या हाताने चाकूचा वार अडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चाकू त्याच्या डाव्या हाताच्या तळहातावर, अंगठा व बोटांच्या मधल्या भागात घुसला, ज्यामुळे त्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली.

विशेष म्हणजे आरोपी हा परिसरात गुंडप्रवृत्तीचा असल्याने त्याची स्थानिक नागरिकांमध्ये पूर्वीपासूनच दहशत आहे. याच दहशतीमुळे घटनेच्या वेळी फिर्यादीला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, उलट परिसरातील लोक घाबरून सैरावैरा पळून गेले.

या घटनेनंतर जखमी फिर्यादी प्रशांत आव्हाड यांनी आरसीएफ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी गु.र.क्र. ५६६/२६ अन्वये आरोपीविरुद्ध बीएनएस कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न), ११५(५), ३५१(२) (धमकी देणे) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस आरोपीच्या शोधार्थ विविध पथके रवाना करत असून लवकरच त्याला अटक करण्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

✍️ रविंद्र राहुल रोकडे, मुख्य संपादक (शिवार माझा)


83
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!