लालबागच्या राजा दरबारी वंचित आघाडीची हजेरी !
मुंबई: मुंबईच्या गणेशोत्सवाची शान आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी सालाबादप्रमाणे यंदाही वंचित बहुजन आघाडीने हजेरी लावली.
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा स्नेहल सोहनी या आज आपल्या प्रमुख सहकारी आणि कार्यकर्त्यांसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाल्या होत्या. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात त्यांनी बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले आणि आरती केली.
‘इडा पिडा टळो अन् वंचितचं राज्य येवो’ – स्नेहल सोहनी, मुंबई अध्यक्षा (वंचित बहुजन आघाडी)
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना स्नेहल सोहनी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी लालबागच्या राजा चरणी एक आगळीवेगळी प्रार्थना केली.
“दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले. बाप्पा चरणी हेच मागणे आहे की, ‘इडा पिडा टळो अन् वंचितचं राज्य येवो’. राज्यातील गोरगरीब, कष्टकरी, वंचित, शोषित समाजाला न्याय मिळावा आणि समतेचे, बंधुतेचे राज्य यावे,” अशी मंगल कामना त्यांनी व्यक्त केली.
इतकेच नव्हे तर देशात आणि राज्यात सौख्य, शांती, समाधान नांदावे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी यावी आणि महागाई, बेरोजगारी सारख्या समस्या दूर व्हाव्यात यासाठीही त्यांनी बाप्पाकडे साकडे घातले.
बाळासाहेब कांबळे यांच्याकडून स्वागत
यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कांबळे यांनी स्नेहल सोहनी यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान केला. मंडळाच्या वतीने त्यांना बाप्पाची छोटी मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते विनय जाधव, शुभम सोहनी आणि नयन जाधव यांच्यासह महिला आघाडी, युवा आघाडीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला.
लालबागचा राजा हा केवळ गणपती नसून तो मुंबईकरांच्या श्रद्धेचा आणि एकतेचा प्रतीक आहे. येथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन बाप्पाचे दर्शन घेतात. वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा दरवर्षी येथे येऊन दर्शन घेत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते.








