मातृभाषेचा पाया भक्कम ठेवून इंग्रजीतून ज्ञानविस्तार करा : प्रा. डॉ. के. एल. पवार
सातारा (प्रतिनिधी) – मातृभाषा ही आपल्या विचारांची, संस्कारांची आणि अभिव्यक्तीची भक्कम पायाभरणी करते. तिच्याशी असलेली नाळ जपतच विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले पाहिजे. आज विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी आणि आधुनिक तंत्रज्ञानातील मोठे ज्ञानविश्व इंग्रजीत उपलब्ध आहे. हे ज्ञान आत्मसात करून जगातील नव्या संधींपर्यंत पोहोचण्यासाठी इंग्रजीची भीती न बाळगता तिच्याशी मैत्री करावी, असे आवाहन प्रा. डॉ. के. एल. पवार यांनी केले.
साहित्यवेल वाचन प्रसार चळवळी अंतर्गत साहित्यवेल स्टडी क्लबच्या वतीने आयोजित ऑनलाइन संवादात ते बोलत होते. इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंग्रजी भाषेचे महत्त्व व इंग्रजीतील वाचनीय ग्रंथ’ या विषयावर हा संवाद झाला. कार्यक्रमाचे आयोजन साहित्यवेलचे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले होते.
प्रा. पवार हे छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील इंग्रजीचे प्राध्यापक असून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.
यावेळी प्रा. पवार म्हणाले, आपल्या हातातील मोबाईल पासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचे सर्व तंत्रज्ञान इंग्रजीत आहे. इंग्रजी शिकणे म्हणजे मातृभाषेकडे दुर्लक्ष करणे नव्हे. मातृभाषेतून विचारांची मुळे मजबूत करायची आणि इंग्रजीच्या साहाय्याने ज्ञानाच्या फांद्या जगभर पसरवायच्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासह अमेरिका आणि इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेऊन आधुनिक ज्ञान भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी वापरले. शिक्षण हे केवळ नोकरीचे साधन नसून अधिकार, लोकशाही मूल्ये आणि व्यापक जग समजून घेण्याची दृष्टी देते, असेही त्यांनी सांगितले.
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना सुरुवातीला इंग्रजी अवघड वाटते, पण रोज थोडे वाचणे, ऐकणे, नवीन शब्द समजून घेणे आणि छोटी वाक्ये बोलण्याचा प्रयत्न केल्यास आत्मविश्वास वाढतो. चुका होण्याची भीती बाळगू नका, असे त्यांनी सांगितले.
आज यूट्यूब, गुगल लेन्स, भाषा शिकवणारी ॲप्स, चित्रकथा यासारखी अनेक साधने उपलब्ध आहेत. केवळ पाठांतर न करता ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या चारही कौशल्यांचा सराव करावा. मोबाईलचा वापर मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञानासाठी करा, तर तो प्रभावी अभ्यास साथी बनेल.
यावेळी त्यांनी दोन उदाहरणे दिली. प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचे पुत्र सुशांत वाघमारे यांनी कोरोना काळात डिजिटल साधनातून जपानी भाषा शिकून जपानमध्ये उच्च शिक्षण व संशोधनाची संधी मिळवली. तर जॅक मा यांनी परदेशी पर्यटकांशी बोलून इंग्रजी सुधारली आणि ई-कॉमर्समध्ये मोठी झेप घेतली.
आपल्या ग्रामीण भागातील संघर्षमय प्रवासातून बी.ए. ते पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण कसे घेतले, हे सांगताना त्यांनी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या संवादाला विटा, माहुली, म्हसवड, पनवेल, गव्हाण, राजापूर, सातारा, मळोली येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी सचिन अवघडे, प्रकाश संकपाळ, विनोद फाळके, तुकाराम लोखंडे, भीमराव मोरे, विठ्ठल गायकवाड, कुमार देवकुळे, सम्यक शाक्यरत्न, चंद्रकांत कोळी यांनी प्रयत्न केले.
शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत “जिज्ञासू विद्यार्थी बना; ज्ञानाची पाने उघडा, जग मोठे आहे” या संदेशाने कार्यक्रम संपला.
साहित्यवेल स्टडी क्लबतर्फे दर रविवारी सायंकाळी ७ वाजता विविध विषयांवर तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन होते, अशी माहिती प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी दिली.









