मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती


मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी ध्येय-धोरणे आणि विविध सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित वॉर्ड अध्यक्षांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि ओळख समारंभ पार पडला. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील संघटन विस्तार, पक्षाची पुढील वाटचाल आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले.

वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, राज्य कमिटी सदस्य सुजात आंबेडकर, दीपक डोके, डॉ. चित्रा कुरहे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात आणि उत्तम वनशिव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे तसेच वंचित बहुजन आघाडीचे विचार आणि भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे, हे आगामी काळातील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई यांच्यासह मुंबई प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, नवनिर्वाचित वॉर्ड अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


83
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!