साहिल वाकोडे प्रकरणी IIT मुंबईच्या प्रवेशद्वारावर आंदोलन; निष्पक्ष चौकशीसह विविध मागण्या


साहिल वाकोडे प्रकरणी IIT मुंबईच्या प्रवेशद्वारावर आंदोलन; निष्पक्ष चौकशीसह विविध मागण्या

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी संघटना ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ यांच्या वतीने आयआयटी मुंबईच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होत साहिल वाकोडे यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यात आला.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांकडून आणि सहकारी विद्यार्थ्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि संपूर्ण सत्य समोर यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

 विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

साहिल वाकोडे यांच्या मित्रांसह काही विद्यार्थी त्यांच्या न्यायासाठी कॅम्पसमध्ये आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या तसेच त्यांच्या लढ्यात आपण सोबत असल्याचे सांगण्यात आले.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, साहिलच्या मृत्यूबाबत संस्थात्मक पातळीवर देण्यात आलेल्या काही माहितीमुळे त्याच्या प्रतिमेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. साहिल विषयी चुकीची किंवा अपुरी माहिती प्रसारित झाली असल्यास त्याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी आणि संबंधित बाबींवर सार्वजनिक भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात आली.

 IIT मुंबई प्रशासनाशी चर्चा

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने IIT मुंबई प्रशासनाची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. साहिल वाकोडे प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी मागणी शिष्टमंडळाने प्रशासनाकडे केली.

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर कोणताही परिणाम होऊ नये आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा दबाव आणला जाऊ नये, याबाबतही प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

‘न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहणार’

साहिल वाकोडे प्रकरणातील सत्य समोर येऊन संबंधित जबाबदारी निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


83
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!