मुंबईत पाणीटंचाईचा फटका, मात्र BMC कडून पाण्याची नासाडी; नागरिक संतापले .
मुंबई : राज्यात ऐन दुष्काळी परिस्थिती असताना आणि अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) मोठ्या प्रमाणात पाण्याचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये युवासेना मुंबई समन्वयक व कामगार सेना चिटणीस पोपट बेदरकर, सोशल मीडिया मुंबई समन्वयक व उपशाखा प्रमुख वैभव सावंत, उपशाखा प्रमुख नितीन राणे, युवाशाखा अधिकारी रितेश रेडकर, युवाशाखा समन्वयक संकेत नर तसेच मनसेचे संदेश चव्हाण यांचा समावेश होता.
पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरत, “नागरिकांना प्यायला पाणी नाही आणि प्रशासन पाणी वाया घालवते, हे कसे चालेल?” असा जाब विचारला. पाण्याची नासाडी तत्काळ थांबवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पाणीटंचाईच्या काळात प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी BMC प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.








