रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाची दशकपूर्ती; एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव


मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले यांच्या दहा वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

“तुमच्या मंत्रिपदाला झाली दहा वर्षे… तुमच्या दशकपूर्तीने आम्हाला झाला हर्ष..!” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आठवले यांच्या दशकपूर्तीचे अभिनंदन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत रामदास आठवले यांनी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. समाजातील दलित, वंचित आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने आवाज उठवत असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

आपल्या खास शैलीने जिंकली मनं

रामदास आठवले यांच्या खास शैलीचाही एकनाथ शिंदे यांनी गौरव केला. त्यांचे भाषण सुरू झाले की वातावरणात उत्साह निर्माण होतो. आपल्या मिश्कील आणि प्रभावी वक्तृत्वातून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची तसेच समोरच्याचे मन जिंकण्याची ताकद त्यांच्यात असल्याचे शिंदे यांनी म्हटले.

आठवले यांचे विविध राजकीय पक्षांतील नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली जाते. त्यामुळेच त्यांचा देशभर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

वंचितांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा

शोषित आणि वंचित घटकांचे प्रश्न असोत किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचा विषय असो, रामदास आठवले हे विविध प्रश्नांवर सातत्याने आग्रही भूमिका घेत आले आहेत. सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर त्यांनी केलेला पाठपुरावा आणि सातत्यपूर्ण भूमिका यामुळे त्यांच्या कार्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या विशेष कार्यक्रमाला रामदास आठवले यांच्या पत्नी सौ. सीमाताई आठवले, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर, सिद्धार्थ कासारे, शिवसेना सह-मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचा गौरव करण्यात आला.


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!