वारसा आणि आरसा.


संत ज्ञानेश्वरांनी शोषणव्यवस्थेच्या विरूध्द सुमारे ७५० वर्षांपूर्वी विद्रोह केला. चारही भावंडासह कोवळ्या वयात केवढी मोठी किंमत मोजली. पण हतबल झाले नाहीत. निराश झाले नाहीत. शरण गेले नाहीत.

अख्ख्या विश्वाची आचारसंहिता होईल, असं अफाट ‘पसायदान’ मागितलं! तोच वारसा संत तुकारामांनीही समर्थपणे पुढं नेला. धार्मिक, वैचारिक, आध्यात्मिक बंड पुकारलं. त्याग केला. प्राणाची किंमत मोजली. पण “कोणाही जीवाचा न घडो मत्सर” हेच आयुष्यभर सांगत राहीले!

महात्मा गांधीनी केवळ विद्रोह केला नाही, तर द्वेषविरहित पर्याय दिला. सकरात्मक आणि सर्वसमावेशक असा कृतिशील पर्याय दिला. धर्म, समाजकारण आणि राजकारण याचा आदर्श पाठ घालून दिला. स्वतः किंमत मोजली. स्वतःवरचे पाच पाच प्राणघातक हमले हसत पचवले! बलिदान दिलं! पण कुणाच्या नावानं गळे काढले नाहीत! आणि हेच संतांचं लक्षण आहे! हेच महापुरुषाचं लक्षण आहे! 

हा वारसाच एवढा मोठा आहे, की अनेक साखर कारखान्यांच्या वारसदारांनी किलो-दोन किलो साखरेचं किती कौतुक करायचं? वाटीभर साखरेसाठी कशाला कुणाच्या दारात जाऊन उभं राहायचं? फक्त आपली दृष्टी तशी विकसित झाली पाहिजे! आपल्याला आपली साखर आणि आजोबा पणजोबांनी उभे केलेले कारखाने ओळखता आले पाहिजेत! त्यांचं मोल समजलं पाहिजे! 

त्यासाठी आपली नियत साफ असली पाहीजे! वारसा विचारांचा असला पाहिजे आणि प्रत्यक्ष कृतितून तो पाझरला पाहीजे! जात, पात, धर्म, पंथ, पक्ष, प्रांत, भाषा असल्या फालतू जंजाळात अडकून न पडण्याचा शहाणपणा, तेवढं भान आम्हाला असलं पाहिजे! 

वारा बघून सारी, ही हालतात पाने 

मी डोलणार आहे, माझ्या मनाप्रमाणे! 

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर (लोकजागर अभियान)


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!