ठाणे | ठाणे शहरातील माजिवाडा जंक्शन येथील मेट्रो पुलाच्या पॅनलमध्ये भेगा पडल्याचे तसेच काही पॅनल सुटल्यासारखे दिसत असल्याचे व्हिडिओ आणि रील्स समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजिवाडा जंक्शन येथील मेट्रो पुलाची पाहणी करून एमएमआरडीएच्या अभियंत्यांकडून पुलाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या दृश्यांमुळे नागरिकांमध्ये पुलाच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी मेट्रो मार्गावरील कर्व्हेचरच्या ठिकाणी काही पॅनल खालून पाहिल्यावर सुटल्यासारखे दिसत असल्याचे निदर्शनास आले.

मात्र, मेट्रो पुलावरील पॅनल बसवताना बीम कास्ट आणि स्टीचिंगच्या माध्यमातून ते एकमेकांना जोडले जातात, अशी माहिती एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी दिली. हे पॅनल कास्ट करून तयार केले जात असल्याने त्यांचा आकार एकसमान असतो. सरळ मार्गावर पॅनल एकसंध आणि सलग दिसतात; मात्र मेट्रो मार्ग वळण घेत असलेल्या ठिकाणी कर्व्हेचरमुळे पॅनलमध्ये काही प्रमाणात फरक दिसू शकतो. त्यामुळे ते बाहेरून सुटल्यासारखे भासत असले तरी आतून त्यांची जोडणी मजबूत असल्याचे अभियंत्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी या पॅनलची मजबुती पुन्हा एकदा तपासण्यात यावी, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. गरज भासल्यास संबंधित पॅनल पुन्हा काढून व्यवस्थित बसवावेत, तसेच गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पॅनलचे स्टीचिंग योग्य पद्धतीने झाले आहे की नाही, याचीही सखोल शहानिशा करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणीवेळी मेट्रो मार्गावर काम करणारे एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाच्या संरचनेची आणि पॅनलच्या जोडणीची आवश्यक ती तपासणी करून कोणतीही शंका राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.









