उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट पोहोचले हॉस्पिटलमध्ये! अण्णा हजारेंच्या तब्येतीची स्वतः घेतली दखल


मुंबई : राज्याचे राजकारण कितीही तापलेले असो, पण समाजसेवेच्या मूल्यांसमोर सारे राजकारण बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थेट बॉम्बे हॉस्पिटल गाठले! कारण होते — गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे झुंज देत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे!
डॉक्टरांना गाठून थेट विचारले — “तब्येत कशी आहे?”
हॉस्पिटलमध्ये पोहोचताच शिंदेंनी अजिबात वेळ न दवडता अण्णांवर उपचार करणारे नामांकित डॉक्टर गौतम भन्साळी यांना गाठले आणि उपचारांची इत्थंभूत माहिती घेतली. प्रकृतीत सुधारणा होते आहे का, पुढचे उपचार काय, याबाबत सविस्तर चर्चा करत उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले.
“अण्णा, समाजाला तुमची गरज आहे” — शिंदेंचा भावनिक संदेश
भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरून संपूर्ण देश हलवणाऱ्या अण्णांच्या विचारांची आजही समाजाला तेवढीच गरज आहे, असे ठाम मत व्यक्त करत शिंदेंनी अण्णांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. “तुम्ही लवकर बरे व्हा आणि पुन्हा एकदा समाजकार्याचे नेतृत्व करा” असा भावनिक संदेशही त्यांनी दिला.


कोण-कोण होते सोबत?
या भेटीत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉ. गौतम भन्साळी आणि राळेगणसिद्धीहून खास आलेले अण्णांचे अनुयायी उपस्थित होते.


पार्श्वभूमी काय?
गेल्या आठवड्यात अण्णांची तब्येत अचानक ढासळली. व्हायरल इन्फेक्शन आणि तीव्र डिहायड्रेशनमुळे त्यांना राळेगणसिद्धीजवळील रुग्णालयातून थेट मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये हलवण्यात आले. तेव्हापासून डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर बारीक नजर ठेवून आहे.

✍️ रविंद्र राहुल रोकडे, मुख्य संपादक (शिवार माझा)


83
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!