धुळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट स्मृती दिन उत्साहात; हजारोंची उपस्थिती, आदर्श शिस्तीचे दर्शन


धुळे | प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेट स्मृती दिनानिमित्त 31 जुलै 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला, लळिंग येथे भव्य अभिवादन कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि देशातील विविध राज्यांतून आलेल्या हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सुमारे 250 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वन विभागानेही आवश्यक ती व्यवस्था केली होती. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.

1998 पासून सुरू असलेली सामाजिक परंपरा 

आयोजकांच्या माहितीनुसार, 1998 मध्ये गौतम जाधव, लंकेश अहिरे, विकास गायकवाड, संदीप गायकवाड, धम्मरतन पानपाटील, राजदीप आगळे तसेच इतर कार्यकर्त्यांनी वलवाडी येथील भीमरत्न मित्रमंडळाच्या वतीने प्रथमच या ठिकाणी दहा महानायकांची छायाचित्रे लावून अभिवादनाचा उपक्रम सुरू केला. त्यानंतर येथे आगळे इतिहास संशोधन व प्रकाशन केंद्र, धुळे उभारण्यात आले.

तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी समाजप्रबोधनासाठी पुस्तक प्रदर्शन भरविण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, भीमस्मृती यात्रा अनेक वर्षांपासून या ठिकाणी आयोजित केली जात आहे.

महार बटालियनकडून मानवंदना

कार्यक्रमात महार बटालियन (मशीनगन बटालियन म्हणूनही ओळखली जाणारी) यांच्या सैनिकांनी मानवंदना दिली. तसेच धुळे जिल्हा समता सैनिक दल, जुनवणे येथील वाघ साहेब, नवी मुंबई समता सैनिक दल आणि विविध स्वयंसेवकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

स्वच्छतेचा आदर्श

कार्यक्रम संपल्यानंतर दोंडाईचा येथील समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी लांडोर बंगला परिसराची स्वच्छता करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले.

विविध संघटनांची उपस्थिती

या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि बौद्ध अनुयायांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. बौद्ध धम्म वंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थितांनी पाळलेली शिस्त आणि शांतता ही कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.

आयोजकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस प्रशासन, वन विभाग, स्वयंसेवक आणि उपस्थित सर्व समाजबांधवांचे आभार मानले.


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!