मुंबई: परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो, असे सांगून सर्वसामान्य तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पायधुनी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळ्या राज्यांतून तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ५० भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.
मस्जिद बंदर (पश्चिम) येथे ‘अल शिफा ट्रॅव्हल्स’ नावाचे कार्यालय थाटून ही टोळी कार्यरत होती. फिर्यादीसह अनेक इच्छुक उमेदवारांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्याकडून मूळ पासपोर्ट, बायोडाटा आणि प्रत्येकी ९५,००० रुपयांची रक्कम घेतली गेली. पैसे आणि पासपोर्ट घेतल्यानंतर कोणतीही नोकरी न देता आरोपींनी कार्यालयाला कुलूप लावून मोबाईल बंद केले आणि पसार झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच एका पीडिताने पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पायधुनी पोलीस ठाणे गु.र.क्र. ८८६/२०२६, कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासाच्या आधारे अटक
गुन्हा दाखल होताच पायधुनी पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. या तपासातून आरोपींचा माग काढत पोलिसांनी मोठी कारवाई केली.
अटक आरोपी:
१) तबरेज आलम अन्सारी – हरियाणा राज्यातून
२) मोहम्मद शमीम अन्सारी – मधुबनी, बिहार राज्यातून
३) व्यंकटेश गंगय्या चकल – जे. जे. डॉर्मेट्री, टेमकर स्ट्रीट, मुंबई येथून
काय काय जप्त केले?
आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
• भारतीय पासपोर्ट – ५० • संगणक / लॅपटॉप – ०६ • मोबाईल हँडसेट – ०९ • बँक चेकबुक्स, डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, वोटिंग कार्ड – १३ • बनावट नेमणूक पत्रे – ०२
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात १० जणांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे, मात्र ही संख्या ५० पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे कोणाचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ पायधुनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त श्री. देवन भारती, सह आयुक्त श्री. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुधा आर., सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती रेणूका बूवा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.
✍️ रविंद्र राहुल रोकडे, मुख्य संपादक (शिवार माझा)









