शिर्डी | प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त शिर्डी येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही साईभक्तांसाठी महाप्रसाद वाटपाचा उपक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला. श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा स्नेहलताई सोहनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे विनय जाधव यांनी केले होते.
बुधवारी पार पडलेल्या या महाप्रसाद वाटप कार्यक्रमात हजारो साईभक्त तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा स्वीकार केला. सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित अशा सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमुळे भक्तांमध्ये सेवाभाव, एकोप्याची भावना आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी अनेक भाविकांनी व्यक्त केली.









