राज्यात पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीनसह सर्वच पिके माना टाकून जळून चालली आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून आता जरी पाऊस आला तरी हातात पीक येण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी तुपकर यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्र्यांकडे मांडलेल्या प्रमुख मागण्या –
या भेटीदरम्यान तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीज मिळावी, जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून द्यावेत, सन २०२४-२५ चा रखडलेला पीकविमा तात्काळ वितरित करावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे, २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करावा तसेच पुनर्गठित आणि रूपांतरित कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीच्या कक्षेत आणावे, अशा मागण्या मांडल्या.
कर्जमाफी दिल्यानंतर शेतकऱ्यांचा CIBIL खराब होऊ नये यासाठी राज्य सरकारने RBI सोबत चर्चा करून बँकांना सक्तीचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यासोबतच ट्रॅक्टर, स्प्रिंकलर, ठिबक सिंचन आणि महाडीबीटी पोर्टलवरील सर्व रखडलेली अनुदाने तातडीने शेतकऱ्यांना द्यावीत आणि जंगली जनावरांपासून पिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज मिळावे यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीला पाठवावे, अशी मागणीही तुपकर यांनी उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.
“आता फक्त आश्वासनं नकोत, थेट निर्णय हवा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा सकारात्मक विचार करून तातडीने मदत जाहीर केली नाही, तर महाराष्ट्रातील शेतकरी पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि निर्णय होईपर्यंत आम्ही थांबणार नाही,” असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.
✍️रविंद्र राहुल रोकडे मुख्य संपादक (शिवार माझा)









