‘मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, बळीराजा हवालदिल.!!


सरसकट कर्जमाफी, हेक्टरी दीड लाख मदत आणि पीकविमा भरपाई ७२ तासांत देण्याची मागणी;

लोकशाही धडक मोर्चाचा प्रशासनाला आठ दिवसांचा इशारा

मालेगाव : शिवार माझा – माळमाथा आणि काटवण परिसरासह संपूर्ण मालेगाव तालुका सध्या भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या ३० ते ४० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने मका, बाजरी, कांदा आणि कापूस ही खरिपाची मुख्य पिके शेतातच करपू लागली आहेत. जमिनीतील ओलावा पूर्णपणे आटल्याने कोरडवाहूच नव्हे, तर बागायती शेतीही आता संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही धडक मोर्चाने सोमवारी जिल्हा प्रशासनाला थेट इशारा देत, तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची व शेतकऱ्यांना ठोस मदत देण्याची मागणी केली.

नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. “शेतकऱ्यांचे हात रिकामे होण्याची वाट पाहत बसणे परवडणारे नाही. आजच पंचनामे सुरू करा, अन्यथा सरकारला मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल,” असा स्पष्ट इशारा जाधव यांनी यावेळी दिला.

राज्य सरकारने यंदापासून १ रुपयातील पीकविमा योजना बंद करून २ टक्के हप्ता पद्धत लागू केल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार आधीच वाढला होता. मोठा खर्च करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता दुष्काळाचे दुहेरी संकट कोसळले असून, कर्जाचा डोंगर आणि हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत करपताना पाहण्याची वेळ आली आहे.

■ प्रमुख मागण्या एका दृष्टिक्षेपात

– तालुक्यात तात्काळ संयुक्त पाहणी व पंचनामे

– मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून त्वरित घोषित करावा

– बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १,५०,००० रुपये आपत्कालीन मदत

– खरीप पीकविमा दावे ७२ तासांत निकाली काढावेत

– सरसकट कर्जमाफी व वीजबिल माफी

– विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी पूर्ण माफ

– पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे नियोजन

– जनावरांसाठी मोफत चारा छावण्या व वैद्यकीय सुविधा

“पीक हातचे जाण्याची वाट पाहत राहणे हा शासनाचा निर्णय असू शकत नाही. पंचनामे, भरपाई आणि कर्जमाफीबाबत आता तत्काळ आणि ठोस भूमिका हवी. शेतकरी आणि जनावरे दोन्हीही जीवघेण्या संकटात आहेत.”

— अनिल जाधव, जिल्हाध्यक्ष, लोकशाही धडक मोर्चा

■ आठ दिवसांचा अल्टिमेटम

आठ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

निवेदनावर लोकशाही धडक मोर्चाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांच्यासह भारत भाऊ म्हसदे, रविदादा भालतडक, दीपक भाऊ पवार, शशिकांत भाई पवार, नितीन पाथरे (नामपूर), बाबाजी पवार (येसगाव), शाकीर शेख, अनिल वाघ, नंदू डावरे, अनिल शिरसागर, नामदेव संतोष पवार, मलिक अंजुम, राजू डांबरे, रवींद्र आहिरे, चेतन कासवे, सुनिता महिरे, देविदास सुरंजे, धनराज शिंपी, शेखर दादा पगार, सम्राट निकम, दिलीप जाधव, रोहिदास कातेपुरी सतमाने, राहुल देवरे, गोकुळ अहिरे, बिपिन पटाईत, आकाश सुरवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, कृषिमंत्री तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक यांनाही पाठवण्यात आली आहे.


83
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!